करजुवे खाडीतील १२५ ब्रास वाळूसाठा जप्त

संगमेश्‍वर ः करजुवे खाडीत अवैधरित्या सुरू असलेल्या वाळू उत्खननावर महसूल यंत्रणेने एकाच आठवड्यात तीन वेळा धाडी टाकून एकूण १२५ ब्रास वाळूसाठा जप्त केला. अवैध वाळू उत्खननासाठी वापरले जाणारे सहा सक्शन पंप, चार बोटी निकामी करण्यात आल्या आहेत.
काही तलाठ्यांची भागिदारी असून त्या परिसरातील कारवाईचा महसूल यंत्रणेला जाणीवपूर्वक विसर पडल्याने पंचक्रोशीवासियांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. करजुवे शाळा, करजुवे विचारेकोंड, धामापूर, नारडुवे, कळंबुशी भागात सक्शन पंपाद्वारे अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. प्रत्यक्षात हातपाटीद्वारे वाळू उपशाची परवानगी व्यावसायिकांना देण्यात आली आहे. तहसीलदार, तलाठी, मंडल अधिकारी यांच्याशी आर्थिक संगनमत केल्याने वाळू व्यावसायिकांची हुकुमशाही गेले तीन महिने सुरू होती. सर्व वृत्तपत्रांनी अवैध वाळू उत्खननाच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर महसूल यंत्रणेला आपल्या कर्तव्याची जाणीव झाली. वाळू उत्खननासाठीचे पंप जप्त केल्याची कागदोपत्री नोंद महसूल यंत्रणेने केली असली तरी प्रत्यक्षात व्यावसायिकांनी ते कारवाईसाठी ताब्यात दिल्याची चर्चा सुरू आहे.

Related Articles

Back to top button