शिवसेनेच्या विरोधामुळे नाणार प्रकल्प रायगडमध्ये
मुंबई : शिवसेनेचा प्रखर विरोध असल्याने नाणार इथं होणार असलेला तेल शुद्धीकरण प्रकल्प आता रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान सभेत ही माहिती दिलीय. कुठल्याही परिस्थितीत नाणार इथं हा तेलशुद्धीकरण प्रकल्प होणार नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर भाजप-सेनेची युती झाली. भाजपने दिलेला शब्द पाळत प्रकल्प हलवला. आता हा प्रकल्प रायगड इथं होणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले, रायगडमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध नाही, 40 गावातील ग्रामस्थांचा प्रकल्पाच्या भूसंपादनाला विरोध नाही. त्यामुळे हा प्रकल्प रायगडला होणार आहे. अलिबाग, मुरुड, रोहा आणि श्रीवर्धनच्या जवळच्या 40 गावांची जमीन यात जाणार आहे.
काय आहे राजकारण?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीची घोषणा करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द अखेर पाळला आहे. नाणार प्रकल्प रद्द करत असल्याची अधिसुचना मार्च महिन्यात काढण्यात आली होती. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीकरता युती करताना ‘नाणार रद्द करावा’ अशी अट उद्धव ठाकरे यांनी ठेवली होती. नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला होता.
उद्धव ठाकरेंनी देखील कोकण दौऱ्यावेळी नाणार होऊ देणार नाही, शिवसेना भूमिपुत्रांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, युतीच्या घोषणेवेळी देखील उद्धव ठाकरे यांनी नाणार प्रश्नी आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी नाणार अधिसूचना रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे.
जमिनी करणार परत
शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत करणार असल्याची घोषणा देखील, सुभाष देसाई यांनी केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 5 हजार हेक्टर तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 300 हेक्टर जमिनींच्या अधिग्रहणाची अधिसूचना काढली होती. पण, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी परत केल्या जाणार आहेत.
दरम्यान, नाणार रद्द झाल्याची घोषणा होत नाही तोवर विश्वास नाही ठेवणार, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली होती. त्यासाठी त्यांनी निवडणुकांपूर्वी नाणार रद्द करा अशी आग्रही मागणी केली होती. तर, नाणार व्हावा यासाठी भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार यांनी नाणारला पाठिंबा असणाऱ्या लोकांसह मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी योग्य तो निर्णय घेतला जाईल अशी भूमिका स्पष्ट केली होती.