मुंबई गोवा हायवेवर बर्निंग कारचा थरार
रत्नागिरी, 19 जून- मुंबई-गोवा महामार्गावर खेड तालुक्यातील बोरज गावाजवळ सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास धावत्या कारमध्ये भीषण स्फोट झाला. नंतर कारला आग लागली. आग एवढी भीषण होती की, चालकाचा होरपळून मृत्यू झाला.
मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की नजीकच असलेले बोरज गाव हादरले. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. तसेच कार चालकाच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला आहे. पाण्याच्या टँकरने आग विझवण्यात आली. या घटनेमुळे महामार्गावर मोठी गर्दी झाली होती. कारला स्फोटानंतर लागलेली आग विझवल्यानंतर कारमधील चालकाचा मृतदेह पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या मदतीने बाहेर काढला.गाडी कोणाची होती, चालक कोण होता, हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.
www.konkantoday.com