अर्थसंकल्पात सिंधुदुर्गला भरीव माप, मत्स्यबीज केंद्र उभारणार, कुणकेश्वर, आंगणेवाडी तीर्थक्षेत्राचा विकास रत्नागिरी जिल्ह्याला मात्र पाने पुसली
मुंबई ः कोकणातील काजू प्रक्रिया उत्पादकांना शासनाने छप्पर फाडून घसघशीत १०० कोटी रुपयांचा निधी देऊन उभारी दिली आहे. यासाठी नवी योजना सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या अर्थसंकल्पात सिंधुदुर्गाची छाप दिसली असून राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रयत्नाने वेंगुर्ला येथे जिताडा, खेकडा, कालव, मत्स्यबीज केंद्र, कुणकेश्वर, आंगणेवाडी तीर्थक्षेत्राचा विकास, सावंतवाडी येथे सुरक्षा रक्षक प्रशिक्षण केंद्र, शिवरामराजे भोसले, मच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक उभारण्याची घोषणा करत सिंधुदुर्ग मुलुखाला खुश केले आहे.
एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पालकमंत्री केसरकर यांनी चांगले निर्णय घेतले असले तरी रत्नागिरी जिल्ह्याला मात्र विकासापासून वंचित ठेवण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यासाठी कोणतीही विशेष घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. असे असूनही रत्नागिरी जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी मात्र याबाबत मौन पाळून बसले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यासाठी तरतूद करण्यासाठी विधानसभेत जिल्ह्यातील स्थानिक लोकप्र्रतिनिधींनी आवाज उठविणे गरजेचे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन आमदार वगळता बाकी आमदार शिवसेनेचे आहेत. राज्याचे राज्यअर्थमंत्री शिवसेनेचे आहेत. रत्नागिरी जिल्ह्याने पहिल्यापासून आतापर्यंत शिवसेनेला साथ देवूनही जिल्ह्याच्या पदरात मात्र काहीही पडलेले नाही.