
जेलमधून फरारी झालेल्या आरोपीला पोलिसांनी चिपळूण-पेढे येथे शिताफीने पकडले
रत्नागिरी ः रत्नागिरी कारागृहात रूपेश तुकाराम कुंभार रा. वेळंब, कुंभारवाडा, ता. गुहागर, जि. रत्नागिरी याला खुनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा झाली होती. हा आरोपी रत्नागिरी कारागृहातून ११.६.२०१९ रोजी फरार झाला होता. त्यामुळे खळबळ उडाली होती. त्याबाबत कारागृह प्रशासनाने रत्नागिरी पोलिसांत तक्रार केली होती. फरारी आरोपीच्या शोधाकरिता पोलीस अधिक्षक डॉ. प्र्रविण मुंडे व अप्पर पोलीस अधिक्षक विशाल गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या मार्गदर्शनाखाली एक खास पथक करून फरारी आरोपीच्या शोधाकरिता पाठविले होते. या पथकाने आरोपींच्या नातेवाईक व अन्य ओळखीच्यांकडून माहिती काढण्यास सुरूवात केली. तसेच आरोपी हा पळून जाण्याआधी भेटावयास आलेल्या नातेवाईक व मित्र यांच्याकडूनही माहिती घेवून आरोपीचा शोध सुरू ठेवण्यात आला होता. या माहितीनुसार आरोपी हा चिपळुण परशुराम लोटे, पेढे, धामणदेवी या भागात असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती.
या शोध पथकाने तीन दिवस जंगलभागात व गावात फिरून आरोपीचा शोध घेतला होता परंतु आरोपी हाती लागला नव्हता. आज १८.६.२०१९ रोजी आरोपी रूपेश कुंभार हा पेढे येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शिताफीने अटक केली. व पुढील कारवाईकरिता शहर पोलीस स्थानकात आरोपीला सोपविण्यात आले आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस निरीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अप्पर पोलीस निरीक्षक विशाल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने, सहा. पो. फौजदार सुभाष माने, पोलीस कॉन्स्टेबल संजय कांबळे, राकेश बागुल, मिलिंद कदम, आशिष शेलार, विजय आंबेकर, अमोल भोसले, दत्ता कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल संदीप कोळंबेकर आदींनी पार पाडली.