
कोर्टाच्या निर्णयानंतरही महाविकासआघाडीमहाराष्ट्र बंद आंदोलन छेडणार
बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या संतापजनक प्रकारानंतर महाविकासआघाडीने उद्या महाराष्ट्र बंदचा इशारा दिला आहे. महाविकासआघाडीच्या या महाराष्ट्र बंदविरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती, त्यावरच्या सुनावणीनंतर हा संप बेकायदेशीर असल्याचं शिक्कामोर्तब हायकोर्टाने केलं आहे.कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर कुणी तसा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले आहेत.हायकोर्टाने महाराष्ट्र बंद बेकायदेशीर असल्याचा निकाल दिल्यानंतर महाविकासआघाडीकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. ‘आज मुली सुरक्षित नाही, माननीय कोर्टाचा आम्ही सन्मान करतो. मी आधी नागरिक आहे, नंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहे. आंधळ्या सरकारला जाग आणण्यासाठी आम्ही आंदोलन करणार आहोत’, असं नाना पटोले म्हणाले आहेत.आमच्या भावना आम्हाला व्यक्त करायच्या आहेत आणि त्या आम्ही करू. कोर्टाचा अवमान आम्ही करणार नाही, जनभावना आम्ही मांडू शकतो. हे महाराष्ट्र जनतेचे आंदोलन असणार, जनसामान्य म्हणून आम्ही रस्त्यावर उतरणार’, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे.