
दापोली-खोंडा येथे दुचाकी अपघातात स्वाराचा मृत्यू
दापोली : शहरातील खोंडा येथे जयंत कॉम्प्लेक्ससमोर दुचाकी अपघातामध्ये प्रसाद बुरटे या 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 2 डिसेंबर रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद बुरटे (रा. पांढरेची वाडी, खेर्डी ) हा आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास खेर्डीकडे निघाला होता. अति वेगाने बेदरकारपणे वाहन चालविल्यामुळे गाडीसह रोडच्या बाजूला असलेल्या गटारात पडून अपघात झाला. या अपघातामध्ये स्वतःच्या मृत्यूस व गाडीच्या नुकसानीस कारणीभूत झाल्याप्रकरणी प्रसाद बुरटे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताची खबर पोलिस नाईक राजेंद्र नलावडे यांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली. पोलिस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पड्याळ करीत आहेत.