
राज्यात नाही तरी दापोलीत मात्र शिवसेना-कॉंग्रेस युती परत होण्याची शक्यता
दापोली ः दापोली नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक येत्या २४ जून रोजी होवू घातली असून या निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेस यांनी गेल्या अडीच वर्षातील प्रासंगिक करार तसा पुढे अडीच वर्षासाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने राष्ट्रवादीचे दापोली नगराध्यक्ष पदाचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दापोली नगरपंचायतीमध्ये १७ लोकनियुक्त नगरसेवक असून यामध्ये शिवसेनेचे सर्वाधिक म्हणजे ७, भाजपाचे २, कॉंग्रेसचे ४ व राष्ट्रवादीचे ४ असे संख्याबळ आहे. २०१४ मध्ये शिवसेना व कॉंग्रेस यांनी एकत्रित येत राज्याचे पर्यावरणमंत्री ना. रामदासभाई कदम व कॉंग्रेसचे आमदार भाई जगताप यांच्या पुढाकाराने अनोखी युती करून एक वेगळे राजकीय समीकरण तयार केले होते.