गेल्या १० वर्षात लांजा- राजापूर मतदारसंघात एकही विकास काम झाले नाही ः अजित यशवंतराव यांचा आरोप
राजापूर ः गेल्या दहा वर्षापासून लांजा-राजापूर साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी असलेले आमदार राजन साळवी हे मतदार संघावर आपले वैयक्तीक वर्चस्व दाखविण्याचे काम करीत आहेत. मात्र गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्तेमध्ये असणार्या या लोकप्रतिनिधीला लांजा राजापूरचे भरभरून नुकसान करण्यापलिकडे काही जमलेले नाही.
गेल्या दहा वर्षामध्ये एकही विधायक काम किंवा आपल्या भागातील जनतेला अभिप्रेत असलेले व अभिमान वाटेल असे एकही काम पहावयास मिळत नाही. हे दुर्दैव असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे युवक नेते अजित यशवंतराव यांनी पत्रकार परिषदेत केली.
मतदार संघात एका वाडीपासून प्रमुख शहरापर्यंत पाणीटंचाई, वीजेचे प्रश्न, रस्ते, आरोग्याच्या सोयी-सुविधा यांचीच बोंब प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळते. आधी सत्ता नाही हे कारण पाच वर्षे जनतेची दिशाभूल केली. मात्र गेल्या पाच वर्षात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्ता असताना सुद्धा ग्रामीण व डोंगराळ भागातील जनतेच्या दैनंदिन जीवनातील अनेक प्रश्न असून यातील एका विषयाला देखील कायमस्वरूपी मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला नाही.