एमआयएम मुस्लिम समाजातील सलोखा बिघडवत आहे कॉंग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष लियाकत शहा यांचा गंभीर आरोप
चिपळूण ः कोकणातील मुस्लिम समाजात एमआयएमच्या माध्यमातून कट्टरवादी रूजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून केवळ मुस्लिम समाजातील सलोखा बिघडण्याची भीती असून कोकणातील मुस्लिम समाजाचा या विचारसरणीला विरोध असल्याचे कॉंग्रेस उपजिल्हाध्यक्ष लियाकत शाह यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
नुकत्याच झालेल्या लोकसभा कोकणातील मतदारांनी वंचित बहुजन आघाडीकडे सपशेल पाठ फिरविली. त्यानंतर आता विधानसभेसाठी मुस्लिम समाजाच्या उमेदवारांचा शोध घेतलाजात आहे. काही इच्छुकांनी मोहल्ल्यातून फिरण्यास सुरूवात केली आहे. यानिमित्ताने कार्यकर्तेही समोरचा उमेदवार केवळ पाडण्यासाठी निवडणूक लढविली जाणार असल्याचे उघडपणे सांगत आहेत. याचाच अर्थ केवळ मतांची विभागणी करण्याच्या उद्देशाने हा खटाटोप केला जात आहे. त्यातून आर्थिक फटका उठवण्याचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र कोकणातील मुस्लिम समाज हा हुशार आहे. या समाजाला कोणीही गृहित धरू नये. तेव्हा वंचित बहुजन आघाडीने उमेदवार निवडून येणार असेल तरच आपला उमेदवार रिंगणात उतरावा, अन्यथा समाजस्तरावर निवडणुका लढवू नयेत.
वंचित आघाडीने मुस्लिम समाजाच्या आधारे सुरू केलेला हा प्रयोग वेळीच थांबवावा. विनाकारण मुस्लिम समाजाचा बळी देवू नये, तसेच कोणीतरी बाहुले उभे करून निवडणुका जिंकता येत नाहीत, असा टोलाही शाह यांनी लगावला आहे.