उपविभागीय अधिकारी कार्यालयात शेकडो दाखले पडून, भाजपा कार्यकर्त्यांचा प्रांत कार्यालयात ठिय्या
दापोली ः उपविभागीय अधिकारी कार्यालय गेले तीन महिने शेकडो दाखले सह्यांविना पडून असून या दाखल्यांवर सह्या न झाल्याने आज भाजपा कार्यकर्त्यांच्यावतीने ठिय्या धरणे आंदोलन करण्यात आले. पूर्वसूचना देवूनही प्रांताधिकारी हजर नसल्याने आंदोलक संतप्त झाले होते.
शैक्षणिक प्रवेशासाठी मार्च पासून दापोली व मंडणगड तालुक्यातील विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, क्रिमिलेअर दाखला, राष्ट्रीयत्वाचा दाखला मिळण्यासाठी सेतू कार्यालयात अर्ज केले असून सेतू कार्यालयातून हे अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपविभागीय अधिकारी श्री. नितीन राऊत यांच्या सह्यांसाठी पाठविण्यात आले आहेत.
मात्र गेले तीन महिने शेकडो दाखल्यांवर सह्या झाल्या नसल्याने ते प्रलंबित असून दापोली तालुक्यातील नागरिक हे दाखले मिळविण्यासाठी दररोज उपविभागीय कार्यालयाच्या पायर्या झिजवित असून दिवसभर दाखला मिळविण्यासाठी या कार्यालयात थांबून रहात आहेत. तरीही दाखला मिळत नसल्याने पालकवर्ग हतबल झाला आहे.