
म्हाप्रळ, लाटवण मार्ग पूर्णपणे बंद करण्याबाबतचा आदेश जारी
रत्नागिरी दि. ६ : कोरोना बाधित क्षेत्र असलेल्या पुणे-मुंबई महानगर क्षेत्रातून रत्नागिरी जिल्हयात येणाऱ्या नागरिकांची तपासणी होणे आवश्यक आहे. या ठिकाणावरुन येताना नागरिक कशेडी घाटासोबतच म्हाप्रळ व मौजे लाटवण येथील मार्गांचा वापर करतात. उपलब्ध मनुष्यबळाचा योग्य वापर होण्याच्या दृष्टीकोणातून आजपासून म्हाप्रळ व मौजे लाटवण येथील मार्गावर सर्वांच्या प्रवेशाला बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या नंतर केवळ कशेडी घाटमार्गेच नागरिकांना येता येईल असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केले. हे मार्ग बंद होत असल्याने मंडणगड तालुक्यातून अत्यावश्यक सेवा वाहने व मालवाहू वाहने यांच्यासाठी पर्यायी मार्ग तहसीलदार मंडणगड व पोलिस निरीक्षक मंडणगड यांच्या समन्वयाने निश्चित करावा असेही आदेशात म्हटले आहे. मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 115 नुसार हा आदेश कोरोना प्रसार रोखण्यासाठी जारी करण्यात आला आहे.