कर्हाडे ब्राह्मण संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार कॅरमपटू आकांक्षा कदम हिला जाहीर
रत्नागिरी-येथील रत्नागिरी कर्हाडे ब्राह्मण सहकारी संघातर्फे राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार राष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम हिला जाहीर झाला आहे. राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेसह महिलांच्या खुल्या कॅरम स्पर्धाही आकांक्षाने गाजवल्या आहेत. राणी लक्ष्मीबाई यांच्या 161 व्या पुण्यस्मरण कार्यक्रमात साहित्यिक डॉ. परीक्षित शेवडे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. झाडगाव येथील कर्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात 23 जूनला दुपारी 3 वाजता कार्यक्रम होणार आहे.
याच कार्यक्रमात डॉ. शेवडे यांचे पाकिस्तान- विनाशाकडून विनाशाकडे या पुस्तकाच्या तिसर्या आवृत्तीचे प्रकाशन प्राचार्य डॉ. सुभाष देव यांच्या हस्ते होईल. तसेच कर्हाडे ज्ञातीतील विवाहाला 50 वर्षे पूर्ण झालेल्या निमंत्रित जोडप्यांचे सत्कार करण्यात येणार आहेत.
आकांक्षाने आतापर्यंत विविध कॅरम स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. ऑल मिरकरवाडा रायझिंग स्टार कॅरम क्लब व रत्नागिरी जिल्हा कॅरम असोसिएशनच्या वतीने आयोजित कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक, राधाकृष्ण मंदिर संस्था आयोजित स्पर्धेत प्रथम, जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धा प्रथम क्रमांक, सावंतवाडी येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय शालेय कॅरम स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2017/18 मध्ये धारावी मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत महाराष्ट्र संघात निवड होऊन कास्यपदक मिळाले. तामिळनाडु (मदुराई) येथे राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेत रौप्यपदक मिळवले. तिने वाराणसी उत्तरप्रदेश येथे उत्तरप्रदेश कॅरम असोसिएशनतर्फे सब ज्युनियर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद कॅरम स्पर्धा सुवर्णपदक पटकावले आहे. तामिळनाडू येथे राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धा रौप्यपदक मिळवले. नागपूर येथे 46 व्या ज्युनियर नॅशनल व इंटरस्टेट कॅरम चॅम्पीयन स्पर्धेत ज्युनियर गटात कांस्यपदक पटकावले. राज्यस्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत तिची महाराष्ट्र संघात निवड झाली. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे दादरमध्ये राष्ट्रीय कॅरम स्पर्धा कांस्यपदक मिळवले. कुडाळ, डेरवण, जाकिमिर्या, नायगाव येथील स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. याबद्दल तिचा सत्कार करणार असल्याचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांनी सांगितले.