
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असताना अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी केली लंपास
रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी असताना अज्ञात चोरट्याने एका वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना घडली. या बांगडीची किंमत अंदाजे ७० हजार रुपये इतकी आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२० वाजता खेड रेल्वे स्थानकात घडली. रंजना वामन पालांडे (६९, रा. दहिसर पूर्व, मुंबई) आपल्या कुटुंबासह गणेशोत्सवानिमित्त खेड येथे आल्या होत्या. परतीच्या प्रवासासाठी त्या पुतण्या विश्वनाथ पालांडे (५१) आणि जाऊबाई आनंदीबाई पालांडे (८०) यांच्यासह सावंतवाडी-दिवा रेल्वेत चढत होत्या.
यावेळी गर्दीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची बांगडी चोरली. गाडीत बसल्यानंतर बांगडी हातातून गायब झाल्याचे त्यांना लक्षात आले.
दिवा येथे उतरावयाचे असल्याने रंजना पालांडे यांनी ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.
.