पहिल्याच पावसाने महामार्गावरील रूंदीकरणाच्या कामाला दडका, माती व दगड रस्त्यावर आल्याने काही भागात वाहतूक ठप्प
रत्नागिरी ः मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. अनेक ठिकाणी डोंगर खोदून माती काढल्याने मातीचे ढीग पहिल्याच पावसात रस्त्यावर आले आहेत. कोकणात विशिष्ठ रत्नागिरी जिल्ह्यात काही भागात वादळी पाऊस पडला. संगमेश्वर, हातिवले भागात रूंदीकरणासाठी खोदलेली माती रस्त्यावर आल्याने या मार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले. अनेक ठिकाणी वाहने चालवणे कठीण झाले. माती रस्त्यावर आल्याने वाहने घसरू लागल्याने त्या भागात वाहतूक ठप्प झाली. कोकणातील मुख्य पावसाला अजूनही सुरूवात व्हायची आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे व तशा सूचना संबंधित कंत्राटदारांना देवून या मार्गावरून जाणार्या वाहनांसाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा ऐन पावसात मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
चिपळूण तालुक्यातील कामथे येथे असाच एक प्रकार घडला असून महामार्गावर कायथे घाटात एक अवाढव्य दगड डोंगरातून येवून रस्त्यावर विसावला आणि संपूर्ण रस्ताच बंद झाला. सुमारे तासभर महामार्गावरील वाहतूक या अवाढव्य रस्त्याने बंद केली होती. मात्र त्यानंतर हा दगड हटवून मार्ग मोकळा करण्यात आला.
चिपळूण ते आरवली असे चौपदरीकरणाचे काम चालू आहे. रविवारी सायंकाळी पडणार्या पावसात विजेचा लोखंी पोल तुटल्याने वाहतूक धिम्या गतीने सुरू होती. त्यातच डोंगरावरून घरंगळत भलामोठा दगड येवून रस्त्यावर थांबला. वाहतुकीची कोंडी झाली. ज्यावेळी दगड कोसळला त्यावेळी तेथून कोणतेही वाहन जात नसल्याने अनर्थ टळला अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.