गणपती बाप्पा मोरया…!बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी कोकणकडे रवाना मंत्री, ॲड.परब यांनी दाखवला एसटीला हिरवा झेंडा

बाप्पाच्या स्वागतासाठी चाकरमानी कोकणकडे रवाना होत आहेत चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाने गणपती स्पेशल जादा गाड्या सोडल्या असून या गाड्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी काल हिरवा झेंडा दाखवला. कोकणच्या दिशेने या गाड्या रवाना होताच गणपती बाप्पा मोरया… असा जयघोष करीत चाकरमान्यांनी एकच जल्लोष केला. सध्या कोकणसह अवघ्या महाराष्ट्रावर कोरोनाचे संकट ओढावले आहे. हे संकटाचे विघ्न लवकरात लवकर निवारू दे आणि एसटीला पूर्वीसारखे चांगले दिवस प्राप्त होऊ दे… असे विघ्नहर्त्याला साकडे घालत मंत्री, ॲड. परब यांनी चाकरमान्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा ‍दिल्या.
गणेशोत्सव हा कोकणातील महत्वाचा सण म्हणून ओळखला जातो. मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या परिसरातील लाखोंच्या संख्येने चाकरमानी दरवर्षी कोकणात जातात. गणपती व कोकणातील चाकरमान्यांचे एक अतुट नाते बनले आहे. त्यामुळे गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांचे नियोजन करते. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी २२०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या जादा गाड्यांना पसंती दिल्याने अवघ्या काही दिवसांत तब्बल २२११ गाड्या फूल झाल्या. त्यापैकी १०५८ गाड्यांना चाकरमान्यांनी ग्रुप बुकिंगला प्राधान्य दिले आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गाड्यांना सुरुवात झाली असून आज दादर, सेनापती बापट मार्ग येथून कोकणकडे रवाना होणाऱ्या जादा गाड्यांना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. परळ आगारातून बुधवारी सुमारे ११० हून अधिक गाड्या सोडण्यात आल्या.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्‍या जादा वाहतूकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रीत केले असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतूकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत. याशिवाय कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरूस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत. प्रवासादरम्यान प्रवाशांना अडचण उद्भवल्यास १८००२२१२५० या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button