अनुकंपा तत्वावर जिल्हा परिषदेत ४२ जणांना कायमस्वरूपी नोकरी
रत्नागिरी ः अनुकंपा तत्वावरील नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आश्वासन जिल्हा परिषदेतील अधिकारी, लोकप्रतिनिधींनी दिले होते. या सर्वांनी वचनपूर्ती करून अनुकंपा तत्वावर ४२ जणांना कायमस्वरूपी नियुक्तीचे पत्र दिले आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध विभागातील मयत अधिकारी, खातेप्रमुख, कर्मचार्यांच्या मुलांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा तत्वावर भरती केली जाते. शासन नियमानुसार सरळ सेवा भरतीच्या १० टक्के या प्रमाणात अनुकंपा तत्वासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले होते.
अनुकंपा तत्वासाठी पात्र ठरलेल्या ४८ उमेदवारांना थेट समुपदेशन, नियुक्तीपत्र देण्यासाठी परिषद भवनातील छ. शिवाजी सभागृहात निमंत्रित करण्यात आले होते. सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सहाय्यक पदावर ४, कनिष्ठ सहाय्यक पदावर १९, परिचर पदावर ६, कंत्राटी ग्रामसेवक पदावर ३, वरिष्ठ लेखा पदावर १, ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ अभियंता पदावर २, शिक्षणसेवक पदासाठी ३, औषध निर्माण अधिकारी पदावर १, पुरूष आरोग्यसेवक पदावर १०, आरोग्य विभागातील स्त्री परिचर पदावर दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. समुपदेशन प्रक्रिया संपताच सर्व संबंधितांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले.