सरकारी लाल फितीचा बेफीकीर कारभार, रस्त्याची मालकी कुणाची आणि नुकसान भरपाई कुणाला?
रत्नागिरी ः पंतप्रधान ग्रामसडक योजनेखाली बांधण्यात आलेल्या रस्त्यावर रिलायन्स जीओने केबल्स टाकण्याची परवानगी मागितल्यावर जि.प. प्रशासनाने रस्त्याची मालकी कुणाची आहे याची शहानिशा तर केली नाहीच व त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून ३१ लाख रुपये भरून घेतले. आणि त्यातही कहर म्हणजे परवानगी मिळण्याआधीच जीओ कंपनीने खोदाई करून कामही पूर्ण केले. हे सर्व प्रकरण आता माहिती अधिकारात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी तालुक्यातील सोमेश्वर, पोमेंडी, तोणदे, चिंचखरी या रस्त्यावर ओएफसी केबल टाकण्याचे काम जीओ कंपनीकडून गेले कित्येक महिने सुरू आहे. या खोदाईमुळे सर्व रस्ते खराब झाल्याने स्थानिक रहिवाशी कौस्तुभ नागवेकर यांनी माहिती अधिकारात अर्ज करून माहिती घेतली असता त्यात धक्कादायक माहिती उघड झाली. जीओ कंपनीने नोव्हेंबर २०१८ मध्ये या रस्त्यावर केबल टाकण्यासाठी जि.प.कडे परवानगी मागितली होती त्यानंतर जि.प.ने या पत्राला उत्तर देवून रस्ते पूर्ववत करण्यासाठी ३१ लाख ४८ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर परवानगी देईपर्यंत काम सुरू करू नये असे सांगितले होते. जीओ कंपनीने पैसे भरून परवानगी येण्याआधीच हे काम पूर्ण केले. मात्र जि.प.ने ही रक्कम आपल्याकडे जरी घेतली असती तरी प्रत्यक्षा या रस्त्याची मालकी अद्यापही जि.प.कडे नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचा कसा सावळा गोंधळ असतो हे दिसून आले आहे.