ब्रेक टेस्टींग ट्रॅक शुभारंभ कार्यक्रम सरकारचा की पक्षाचा राष्ट्रवादीच्या आमदारांना डावलल्याने संताप
रत्नागिरी ः चिपळूण येेथे नुकताच ब्रेक टेस्टींग ट्रॅकचा शुभारंभाचा कार्यक्रम पार पडला. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी ट्रॅक व्हावा यासाठी मागणी होत होती. काल या ट्रॅकच्या शुभारंभाचा कार्यक्रम खा. विनायक राऊत यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी चिपळूणचे आमदार सदानंद चव्हाण व अन्य शिवसेनेचे व भाजपचे नेते तसेच रिक्षा मालक संघटनेचे अध्यक्ष व परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी विनोद चव्हाण उपस्थित होते. हा सरकारी कार्यक्र्रम असून देखील गुहागरचे आमदार भास्करराव जाधव, खेड दापोलीचे आमदार संजय कदम व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना उद्घाटन कार्यक्रमाला डावलण्यात आल्याने कार्यकर्त्यांत संताप व्यक्त करण्यात येत आहे. आ. भास्करराव जाधव यांनी या विषयी संताप व्यक्त करून हा प्रश्न आपण विधानसभेत नेणार असून संबंधित अधिकार्यांच्या विरोधात हक्कभंगाची तक्रार करणार असल्याचे सांगितले. या ब्रेक टेस्टींग ट्रॅकमुळे मंडणगड, खेड, दापोली, गुहागर, चिपळूण आदी भागातील जनतेची मोठी सोय होणार आहे. हा पाच तालुक्याचा कार्यक्रम असताना देखील फक्त खासदार व शिवसेनेचे चिपळूणचे आमदार व त्यांचे कार्यकर्तेच या कार्यक्रमाला हजर होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या दोन्ही आमदारांना डावलण्यात आल्याने हा कार्यक्रम सरकारी होता की पक्षाचा होता याविषयी संभ्रम निर्माण झाला असून त्याविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र आ. भास्कर जाधव यांनी या विषयी आक्रमक भूमिका घेतली असून हे प्रकरण आता विधानसभेत उपस्थित होणार असल्याने संबंधित अधिकार्यांची दाणादाण उडाली आहे.