
पालकमंत्र्यानी दिलेल्या निधीमुळे गोवळकोट बंदराचे स्वरूप बदलले, पर्यटकांचा ओघ वाढला
चिपळूण ः गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या गोवळकोट येथील बंदराचे नुतनीकरण करण्यात आले. आता येथे बंदर सुरू झाले असून पर्यटकांमध्ये यावर्षी कमालीची वाढ झाली आहे. यावर्षीच्या हंगामात साधारण जानेवारीपासून मेपर्यंत सुमारे अडीच हजार पर्यटकांनी येथे हजेरी लावत क्रोकोडाईल सफरसह दाभोळ खाडीतील निसर्ग सौंदर्याचा तितकाच मनसोक्त आनंद घेतला.
पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या सहकार्यातून जिल्हा नियोजन मंडळामार्फत ६२ लाखांचा निधी या बंदर नुतनीकरणासाठी प्राप्त झाला. या निधीतून दाभोळ बंदर विकास विभागाच्या अखत्यारित असलेल्या जागेत पर्यटकांच्या सोयीच्या दृष्टीने अद्ययावत स्वरूपाची इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीला एखाद्या बोटीचा आकार देण्यात आला असून त्यामध्ये विशिष्ट पद्धतीची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दोन स्वतंत्र स्वच्छतागृह, फ्रेशरूम व तिकिटघरची व्यवस्था करण्यात आली आहे. या बंदरावर पर्यटकांच्या सोयीसाठी सहाहून अधिक फेरी बाटी असून ग्लोबल चिपळूण टुरिझमनेही स्वतंत्र बोटीची व्यवस्था केली आहे