आंध्र प्रदेश देशातील ५ उपमुख्यमंत्री असणार पहिल राज्य होणार
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवत आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळवला. तब्बल दहा वर्षाच्या संघर्षानंतर जगनमोहन रेड्डी आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.
आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाने माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्त्वाखालील तेलगू देसम पक्षाचा सुपडासाफ केला. वायएसआर काँग्रेसने १७५ पैकी १५१ जागा जिंकल्या. तर त्यांच्या पक्षाने लोकसभेच्या २५ पैकी २२ जागा मिळवल्या. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर अनेक धडाकेबाज निर्णयाची मालिकाच सुरु केली आहे.
नुकतेच आशा वर्कर्सना केलेल्या तिप्पट पगारवाढीची देशभरात चर्चा झाली. त्यानंतर आज जगनमोहन रेड्डी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी सरकारमध्ये पाच उपमुख्यमंत्री ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे पाच उपमुख्यमंत्री अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीय जाती, अल्पसंख्याक आणि कापू समाजातील असणार आहेत. जगमोहन रेड्डी यांनी शुक्रवारी पार पडलेल्या विधीमंडळाच्या बैठकीत ही घोषणा केली.
देशात पहिल्यांदाच एखाद्या राज्यात पाच उपमुख्यमंत्री असणार आहेत. याआधी चंद्राबाबू नायडू यांच्या कार्यकाळात दोन उपमुख्यमंत्री होते. यामधील एक मागासवर्गीय जाती आणि दुसरे कापू समाजातील होते. शनिवारी २५ जण मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती जगमोहन रेड्डी यांनी दिली आहे.