
स्वरभास्कर बैठक : संधी प्रहर आर्ट सर्कल रत्नागिरी आयोजित स्वरभास्कर बैठक ही शास्त्रीय संगीत मैफल
. दि. ११ ऑगस्ट रोजी राधाबाई शेट्ये सभागृहात साकारणार आहे. दुपारी 3 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत रसिकांना संध्याकाळच्या प्रहरातील राग ऐकायला मिळणार आहेत. स्वरभास्कर बैठकीचे हे सलग 14 वे वर्ष असून कोरोनाकाळात देखील आर्ट सर्कलने आपल्या समाज माध्यमावरून ही मैफल साकारली होती. अत्यंत निष्ठेने शास्त्रीय संगीताची जोपासना आणि उपासना करणारी गुणी तरुण कलाकार मंडळी स्वरभास्कर बैठकीसाठी आपले गायन वादन सादर करतात आणि त्यानंतर ज्येष्ठ कलाकार बैठकीचा समारोप करतो अशा रचनेने ही मैफल साकारते. यंदा होणाऱ्या या संधी प्रहर बैठकीसाठी रत्नागिरीतील करुणा पटवर्धन, तन्वी मोरे, श्रीधर पाटणकर, देवगडची सावनी शेवडे, कणकवली चे मनोज मेस्त्री, आणि संगमेश्वर चां विशारद गुरव गाणार आहेत. या कलाकारांच्या साथीला चैतन्य पटवर्धन, मंगेश मोरे, श्रीरंग जोगळेकर, हर्षल काटदरे, वरद सोहनी हे संवादिनी वादक आणि राजू धाक्रस, अभिनव जोशी, स्वरूप नेने, पुष्कर सरपोतदार, प्रथमेश शहाणे, केदार लिंगायत हे तबलावादक मैफिलीत रंग भरणार आहेत. या तरुण कलाकारांनंतर ज्येष्ठ गायक पंडित समीर दुबळे शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. समीर दुबळे यांनी गायनाचे धडे संगीत क्षेत्रातील अध्वर्यू राम माटे, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि अशोक रानडे यांच्या कडून गिरवले आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील समीर दुबळे हे अत्यंत महत्वाचे नाव आहे. त्यांचे समारोपाचे गायन ही रसिकांसाठी मेजवानी ठरणार आहे. याच मैफिलीच्या दरम्यान या कार्यक्रमाची मध्यवर्ती कल्पना असलेले प्रहरातील रागांचे रंग अमूर्त चित्राच्या रूपाने चित्रकार अनुजा कानिटकर आणि सहकारी रेखटणार आहेत. ही देखील एक अनोखी पर्वणी या कार्यक्रमादरम्यान अनुभवता येणार आहे. सर्व रसिकांसाठी ही मैफल विनामूल्य आहे. स्वरभास्कर बैठकीला नेहमीप्रमाणेच उदंड प्रतिसाद द्यावा असे आवाहन आर्ट सर्कल रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आले आहे.