समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकाचा गणपतीपुळे येथे समुद्रात बुडून मृत्यू
रत्नागिरी ः गणपतीपुळे येथील समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या अहमदनगर येथील चार पर्यटकांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला. तर तिघांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले आहे.
अहमदनगर येथून काही पर्यटक गणपतीपुळे येथे आले होते. सकाळी ९ वा. हे पर्यटक गणपतीपुळे येथे दाखल झाल्यानंतर ते थेट समुद्र स्नानासाठी गेले. समुद्रात आंघोळ करीत असताना यातील सुशिल दिपक देवणे (४०) त्यांची पत्नी त्रिवेणी देवणे (३०), मित्र निलेश दशरथ करडक व त्यांची पत्नी शितल करडक असे मिळून होते. त्यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने सुशिल देवणे हे खोल समुद्रात ओढले गेले.
जीवरक्षकांसह येथील व्यापारी आणि पोलिसांनी मदतीसाठी धाव घेतली. पाण्यात उड्या घेवून पाण्यात असलेल्यांना बाहेर आणण्यात आले. त्यांना तात्काळ देवस्थानच्या रूग्णवाहिकेतून मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी कृष्णा कदम यांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेची नोंद जयगड पोलीस स्थानकात केली असून याचा तपास पोलीस करीत आहेत.