वाशिष्ठी नदीतील अवजलाचे प्रमाण खालावले
चिपळूण ः गेल्या अनेक दिवसांपासून दुथडी भरून वाहणारी वाशिष्ठी नदी आता पूर्णतः कोरडी पडली आहे. कोयना धरणातील टप्पा १ व २ सुरू ठेवून केवळ ४० मेगावॅट वीज निर्मिती केली जात असल्याने तूर्तास वाशिष्ठी नदीला अवजलाचे प्रमाण खूपच खालावले आहे. परिणामी अनेक दिवसानंतर येथील वाशिष्ठी नदीचे पात्र कोरडे पडल्याने या नदीवरील नगर परिषदेच्या पाणी योजनेह अन्य ग्रामीण भागातील पाणी योजनाही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणार्या कोयना धरणातील अवजल वीज निर्मितीनंतर थेट वाशिष्ठी नदीपात्रात सोडले जाते. त्यातच कडाक्याच्या उष्म्यात वाढत्या मागणीमुळे वीज निर्मितीचे प्रमाण वाढविण्यात आले होते. यामुळे येथील वाशिष्ठी नदीला गेल्या अनेक दिवसांपासून अवजल दुथडी भरून वाहत होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून या वाशिष्ठी नदीचे पात्र पूर्णतः कोरडे पडले असून नदीतील दगड गोटे अगदी सहज नसरेस पडेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.