माडबन समुद्रकिनारी ४ फूट उंचीचा वाळूचा डोंगर
राजापूर ः तालुक्यातील माडबन हद्दीतील समुद्रातून माडबन आणि मिठगवाणे गावात जाणार्या खाडीच्या मुखाशी सुमारे चार फूट उंच व पाचशे मीटर लांबीचा वाळूचा डोंगर तयार झाला आहे. त्यामुळे समुद्राच्या भरतीचे पाणी माडबन आणि मिठगवाणे गावात जाणे बंद झाले आहे. भरतीचे पाणी खाडीमार्गे माडबन, मिठगवाणे गावांमध्ये जातच नसल्याने गावातील विहिरी पूर्णपणे कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे खाडीच्या मुखाजवळ तयार झालेला हा वाळूचा उंचवटा बाजूला करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
खाडीकिनारी निर्माण झालेल्या वाळूच्या उंचवट्यामुळे पावसाळी हंगामात एरव्ही पावसाचे पाणी समुद्रात जाण्यासाठी अडथळा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. परिणामी पावसाचे पाणी ग्रामस्थांच्या घरे तसेच शेतात जावून पुरस्थिती ओढवण्याची देखील भीती व्यक्त होत आहे. याबाबत आ. राजन साळवी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.