पावसाळ्याआधी जगबुडी नदीवरील नव्या पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता
खेड ः जगबुडीवर उभारण्यात येत असलेल्या नव्या पुलाच्या रखडलेल्या पुनर्बांधणीच्या कामाने गती घेतली आहे. यामुळे पावसाळ्यापूर्वी नव्या जगबुडी पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. पुलाच्या कामाचा ठेका घेतलेल्या कल्याण टोलवेज कंपनीनेही जूनच्या पंधरवड्यात या पुलाचे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे.
पावसाळ्यात जुन्या जगबुडी पुलावरून वाहने चालविताना वाहनचालकांना कराव्या लागणार्या कसरतींना ब्रेक मिळणार आहे. जुना पुल धोकादायक बनला असून वाहने चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर चार वर्षापूर्वी नव्या जगबुडी पुलाच्या कामाला सुरूवात झाली. मात्र या पुलाचे काम रखडले होते. यासाठी विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या पुलावर आंदोलन छेडले होते. त्यानंतर प्रशासनाने मार्च अखेरपर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. याच दरम्यान रखडलेल्या नव्या जगबुडी पुलाचा कामाचा ठेका टोलवेज इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला देण्यात आला. कंपनीने पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे नवीन पुलावरून वाहतूक सुरू होणार असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.