कोयना धरणातील पाणी साठ्यात घट, वीजनिर्मितीवर परिणाम होणार
रत्नागिरी ः महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणार्या कोयना धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. त्यामुळे महानिर्मिती कंपनीने एक जूनपासून दोन हजार मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पासाठी कमी पाणी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच वीज निर्मितीसाठी तीन टीएमसी पाणीसाठा आरक्षित करण्यावर शिक्कामोर्तब केले असून या पाण्याचा वापर विजेसाठी करण्यात येणार आहे.
कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी असून गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात धरण भरले. त्यामुळे धरणातून आतापर्यंत पूर्वेकडील सिंचन व पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी १०१.८८ टीएमसी पाणीसाठा देण्यात आला आहे. पण कोयना धरणातील पाणीसाठ्याने सध्या तळ गाठला आहे. धरणात केवळ १२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जून महिन्यात धरणातील पाणीसाठा कमी झाल्यास कोयनेची वीज बंद पडण्याचे संकट ठाकणार आहे. वीज कंपनीने पाणीकपात धोरण स्विकारावे असा प्रस्ताव कोयना प्रकल्पाने दिला होता. मुंबई येथे झालेल्या वीज कंपनीच्या प्रमुख अधिकार्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे जून महिन्यात कोयना धरणातील तीन टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्यात येणार आहे.