सरकारी योजना लाभार्थीपर्यंत नाही योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
रत्नागिरी ः चिपळूण तालुक्यातील कुशिवडे घरकुल योजना, राष्ट्रीय पेयजल योजनेसह उज्वल गॅस योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मुख्यमंत्र्यानी चौकशीचे आदेश दिल्यानंतरही जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकारी चौकशीचा फार्स करीत आहेत. या भ्रष्टाचारात ग्रामपंचायतींसह चिपळूण पंचायत समितीतील अधिकारी दोषी आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करा, अशी मागणी छावा युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती बाबासाहेब भोसले-पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.
बंगले असलेल्यांना खिरापती प्रमाणे इंदिरा आवास योजनेतील घरकुले बेकायदेशीर वाटली आहेत. गॅस उज्ज्वल योजनेतही गरीबांची लूट करून १०० ऐवजी ७०० रुपये घेतले जात आहेत. राष्ट्रीय पेयजल, हगणदारी मुक्त गाव, पाणलोट या योजनांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे पुरावेही आहेत. जिल्हा परिषद, कोकण आयुक्त आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या भ्रष्टाचाराबद्दल आम्ही निवेदन दिले आहे. माहितीच्या अधिकाराखाली आणखी काही माहिती मागविली आहे.