
नगराध्यक्ष निवडणुकीत कुवारबाव पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न
रत्नागिरी ः रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी अचानक राजीनामा दिल्याने येत्या काही महिन्यात नगराध्यक्षपदाची निवडणूक घ्यावी लागणार आहे. सध्या शिवसेनेची ताकद वाढली असल्याने नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचे यश निश्चित मानले जात असल्याने त्याला ठाम पर्याय ठरावा यासाठी कुवारबांव पॅटर्न राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेच्या विरोधात भाजपसह अन्य पक्ष एकत्र आले होते व त्यांनी ग्रामपंचायत ताब्यात घेतली होती. परंतु त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. लोकसभा निवडणुकीत भाजप-सेना युती झाल्याने आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे या पॅटर्नमध्ये भाजप सहभागी होण्याची शक्यता कमी दिसत आहे. कुवारबाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचे नेते निलेश राणे यांनी मोठी भूमिका बजावली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाल्याने ते नगराध्यक्षाच्या निवडणुकीत कितपत पुढाकार घेतील याबद्दल शंका आहे. परंतु शिवसेनेला विरोध करायचा असेल तर अन्य पक्षानी एकत्र येणे गरजेचे असल्याने त्या दृष्टीने सध्या चाचपणी सुरू आहे.