गणेशोत्सवासाठीच्या विशेष ट्रेनही हाऊसफुल्ल! चाकरमानी चिंतेत
मुंबई ः गणेशोत्सव काळात प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने १६६ विशेष फेर्यांची आरक्षण प्रक्रिया रविवार २५ मेपासून खुली केली. मात्र पहिल्याच दिवशी विशेष ट्रेनची तिकिटे संपल्याने प्रवासी चिंतेत पडले आहेत. विशेष म्हणजे मुंबई-सावंतवाडी, मुंबई-रत्नागिरी-पनवेल, पनवेल-सावंतवाडी – मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस ते झाराप-पनवेल या विशेष गाड्यांची प्रतिक्षायादी २०० ते ३०० च्यावर गेली आहे. परिणामी गणेशोत्सवात गावी जाणार कसे, असा प्रश्न कोकणवासियांना पडला आहे.
कोकणात जाणार्या तुतारी, कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी आणि तेजस या महत्वाच्या मेल एक्स्प्रेसचे गणेशोत्सव काळातील आरक्षण संपले होते. त्यामुळे मध्य रेल्वेने १७ मे रोजी गणेशोत्सवासाठी १६६ विशेष फेर्यांची घोषणा केली. मात्र आरक्षणाच्या पहिल्याच दिवशी या गाड्यांची तिकिटेही संपल्याचे आयआरटीसीच्या संकेतस्थळावरून दिसून आले. २ सप्टेंबरला लाडक्या गणेशाचे आगमन आहे.