
रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे-एमआयडीसी परिसरात उघडकीस आलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणात त्या’ प्लॉट मालकाला मिळत होता ‘हिस्सा’
*रत्नागिरी शहरालगतच्या मिरजोळे-एमआयडीसी परिसरात उघडकीस आलेल्या वेश्याव्यवसाय प्रकरणाचा धक्कादायक तपशील समोर आला आहे. या व्यवसायातून होणाऱ्या कमाईतला काही हिस्सा थेट प्लॉट मालक सुनिलकुमार गणपत प्रभू याला मिळत असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
या प्रकरणात प्रभूला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच संशयित नेपाळी महिलेची पोलिस कोठडी संपल्याने तिला शनिवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तिच्या पोलिस कोठडीतदेखील दोन दिवसांची वाढ केली आहे.
एमआयडीसीतील ई-६९ हा प्लॉट प्रभूने १९९१ मध्ये औद्योगिक वापरासाठी खरेदी केला होता. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून या ठिकाणी नेपाळी महिला वास्तव्यास होती. तसेच पुण्यातील दोन महिला मागील पंधरा दिवसांपासून येथे राहात होत्या. यांच्यामार्फत नेपाळी महिला देहविक्रीचा व्यवसाय चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने या दोन महिलांची मुक्तता केली असून, सध्या नेपाळी महिला व प्लॉट मालक दोघेही पोलिस कोठडीत आहेत.




