उद्या होणार्या मतमोजणीत राज्याचे लक्ष कोकणाकडे – राणे, तटकरेंसह शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला
रत्नागिरी ः रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि रायगड लोकसभा मतदार संघाच्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. उद्या मतमोजणी होणार असून त्यातून कोकणात कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासाठी ही जागा जिंकणे महत्वाचे असून या सर्वांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांना रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून कोणत्याही परिस्थितीत निवडून आणणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. सिंधुदुर्गात त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जबरदस्त प्रचार मोहीम राबवित प्रचंड मेहनत घेतल्याची चर्चा आहे. त्यांना रत्नागिरी जिल्हा किती साथ देतो याकडे लक्ष लागले आहे. त्यांना सिंधुदुर्गात कमी लीड मिळाले तर रत्नागिरी जिल्हा ती कमतरता भरून काढेल अशी अपेक्षा आहे. शिवसेनेचे पाच आमदार, एक खासदार आणि दोन पालकमंत्री आहेत. या निकालातून पालकमंत्री दीपक केसरकर आणि वैभव नाईक यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघासाठी रत्नागिरी येथील एफसीआय गोडावूनमध्ये सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी होईल. यासाठी विधानसभा मतदार निहाय १४ टेबलवर ही मोजणी करण्यात येणार आहे. यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी, मतमोजणीची कार्यपद्धती, मतमोजणीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेले निर्देश आदींबाबत यावेळी माहिती देण्यात आली.
लोकसभेची निवडणूक ही विधानसभेची सेमीफायनल आहे. त्यामुळे सगळेच राजकारणी आपलं तिकिट पक्क करण्यासाठी आपल्या उमेदवाराला जिंकून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले आहेत. लोकसभा मतदारसंघ फेररचनेनंतर सलग दोनवेळा विजय मिळविलेल्या केंद्रीय मंत्री अनंत गीतेना तटकरे यांनी यावेळी कडवं आव्हान दिले आहे. पाच वर्षापूर्वी वेगवेगळे लढणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेकाप यावेळी एकत्र आलेत. या मतदारसंघातली साधारण दीड लाख मतांची शेकापची ताकद मिळाली तर गतवेळी निसटता पराभव पत्करणार्या सुनिल तटकरेंना विजय मिळणार का? हे निकालानंतर स्पष्ट होईल.