
स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत १२ कोटी ७६ हजारांच्या नव्या ठेवी
रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेच्या ठेववृद्धी मासाची आज सांगता झाली. यामध्ये एकूण १२ कोटी ७६ हजार रुपयांच्या नव्या ठेवी संस्थेत गोळा झाल्या असून प्रथमच विक्रमी नोंद झाली आहे. १०१२ ग्राहकांनी या ठेवी विश्वासाने ठेवल्या आहेत. संस्थेच्या एकूण ठेवी २६१ कोटी २६ लाखांवर पोहोचल्या असून मार्च २०२३ मध्ये त्या २७५ कोटी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सर्व शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा झाल्या. कोरोना कालावधीनंतर प्रथमच चांगल्या प्रमाणात ठेवी गोळा होत असून अर्थचक्र सुरळित झाल्याचे हे चिन्ह असल्याचे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
रत्नागिरी प्रधान शाखेमध्ये २ कोटी ३८ लाक, मारुती मंदिर शाखेत १ कोटी ७८ लाख आणि राजापूर शाखेत १ कोटी ५५ लाख रुपयांच्या ठेवी ग्राहकांनी ठेवल्याची माहिती संस्थाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास २० जून ते २० जुलै या कालावधीत आयोजित केला होता. ठेववृद्धी मासाचे हे २७ वे वर्ष होते. संस्थेमध्ये सध्या २० हजार ९७ फिक्स डिपॉझिट खाती आणि ४५ हजार ३०९ बचत खाती आहेत. सहकार चळवळ अधिक वृद्धींगत होत असल्याचे हे द्योतक असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी नमूद केले.
ग्राहकांची संख्या ४१ हजारच्या घरात आहे. संस्थेच्या १३३ कोटी रुपये ठेवी गुंतवणूक, १६७ कोटी रुपये कर्ज, ३१ कोटी ८६ लाख स्वनिधी, ३०९ कोटींचे खेळते भांडवल अशी आकडेवारीसुद्धा अॅड. दीपक पटवर्धन यांनी जाहीर केली.
पाच नवीन शाखा सुरू करणार
संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले की, स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या पाच नव्या शाखांसाठी प्रस्ताव शासनाकडे देणार आहोत. त्यातील एक शाखा रत्नागिरीमध्ये व सिंधुदुर्ग आणि आणखी दोन ठिकाणी सुरू करण्याचा मानस आहे. संस्थेचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र आहे. कोल्हापूर आणि ठाणे येथेसुद्धा शाखा सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
सोने तारणसाठी नवीन योजना
सोने तारण कर्जाला नेहमीच उदंड प्रतिसाद मिळतो. त्यानुसार मच्छीमार, आंबा बागायतदार आणि विद्यार्थ्यांच्या गरजा भागवण्यासाठी सोने तारणची नवीन योजना सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे, असे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले.