पाण्यासाठी व्याकुळलेल्या निवळी व बावनदी गावातील लोकांना आता टँकरद्वारे पाणी पुरवठा
रत्नागिरी ः निवळी धरणातून जिंदाल कंपनीला पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची पातळी खाली गेल्याने निवळी, बावनदी गावातील ग्रामस्थांच्या विहिरीचे पाणी संपले आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थांचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत म्हाडाचे अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी लक्ष घालून एमआयडीसीचे अधिकारी व जिंदालच्या अधिकार्यांबरोबर चर्चा करून पाऊस पडेपर्यंत टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे आदेश दिले. निवळी व बावनदी गावातील चार विहिरींनी पाण्याचा तळ गाठला आहे. त्यामुळे या गावातील लोकांनी पाण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले होते. ही गोष्ट आ. सामंत यांच्यापर्यंत आली असता त्यांनी हस्तक्षेप करून एमआयडीसीच्या अधिकार्यांना सूचना केल्या. आवश्यक असल्यास जिंदाल कंपनीचे पाणी बंद करून ग्रामस्थांना प्राधान्याने पाणी द्यावे अशी सूचना केली.