रत्नागिरी जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा प्रकार, चिपळूण गुहागर भागातील २५० गुंतवणुकदारांना फटका
रत्नागिरी ः रत्नागिरी जिल्ह्यात मार्केटींग कंपन्यांकडून तसेच काही चैन सिस्टीम कंपन्यांनी वेगवेगळी आमिषे दाखवून फसवणुक करण्याच्या अनेक घटना घडल्या असल्या तरी दरवेळी फसवणुकीच्या नवीन नवीन घटना घडत आहेत. चिपळूण तालुक्यातील रिद्धीसिद्धी या कंपनीत लाखो रुपयांची गुंतवणूक करणार्या गुंतवणुकदारांना परतावा न मिळाल्याने ते संतप्त झाले आहेत. वर्षापूर्वीच स्थापन झालेल्या या कंपनीने प्रत्येकी ३५ हजार रुपये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. त्याला अनेक गुंतवणुकदार बळी पडले व त्यांनी यामध्ये लाखो रुपयांची गुंतवणूक केली. क्राफ्ट डिझाईन करून घरच्या घरी पैसे मिळवा अशी आमिषे दाखवून दर महिन्याला प्रत्येकाला १५ हजार रुपये देण्यात येतील असे सांगण्यात आले होते. सुरूवातीला काही जणांना तसा मोबदला मिळाला परंतु नंतर मात्र कोणालाही मोबदला न मिळाल्याने गुंतवणुकदार संतप्त झाले. या गुंतवणुकदारांनी कंपनीच्या मालकाला घेराव घातला व आपली रक्कम परत देण्याची मागणी केली. कंपनीच्या या मालकाने आपण पैसे बुडविणार नाहीत मला मुदत द्या अशी विनवणी केली. शेवटी २९ मे रोजी परत बैठक घेवून जुन महिन्याचे धनादेश मिळाले नाहीत तर त्याबाबत आवाज उठविण्याचे गुंतवणुकदारांनी ठरविले आहे.