
नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्या वादात रत्नागिरीकर तहानलेले
रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली असून त्याचा फटका अनेक भागातील नागरिकांना बसत आहे. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असूनही शहराला पाणीपुरवठा होऊ शकत नाही. पाणी वाटपावर नगरपरिषदेचे कोणतेही नियोजन नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसला आहे. शहराच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई जाणवू लागली आहे .नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली असून अनेक ठिकाणी आतापासूनच खाजगी टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे .पाणी सभापती सुहेल मुकादम हे नगर परिषदेच्या प्रशासनाच्या कारभारावर नाराज असून आपण नागरिकांना पाणी मिळावे यासाठी पहाटे उठून प्रयत्न करीत आहे. मात्र नगर परिषदेचे प्रशासन त्यावर अंकुश ठेवणारे मुख्याधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याचे त्यांचे मत आहे .आता महत्त्वाच्या वेळी नगर परिषदेचे वरिष्ठ अधिकारी रजेवर जात असून तिची कोणती कल्पना सभापतींना दिली जात नाही. सभापतींनी सांगितलेले उपाय यावर कोणतीही अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात नसल्याने याचा फटका नागरिकांना बसत आहे .आतापासूनच ही परिस्थिती राहिल्यास पुढे गंभीर परिस्थिती ओढवू शकते. नगर परिषदेच्या प्रशासन लोकप्रतिनिधी यांच्या वादात रत्नागिरीकर नागरिक मात्र तहानलेले राहत आहेत. या परिस्थितीवर वेळीच अंकुश ठेवणे गरजेचे असून जिल्हाधिकारी व तालुक्याचे आमदार उदयजी सामंत यांनी तातडीने लक्ष घालणे आवश्यक आहे.