चिपळूण न.प. विरोधात हॉटेल, लॉजिंगच्या मालमत्ता कराचा निकाल
चिपळूण ः येथील नगर परिषदेकडून शहरातील लॉजिंग व हॉटेल व्यावसायिकांना व्यावसायिक पद्धतीने लागू करण्यात आलेल्या मालमत्ता कराविषयीचा निकाल नगर परिषदेच्या विरोधात लागला आहे. त्यामुळे आता नेमका कर किती असावा, याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. याविषयी नगर रचना विभागाने मार्गदर्शन करावे अशी मागणी येथील नगराध्यक्षा सौ. सुरेखा खेराडे यांनी रत्नागिरीतील नगर रचनाकार श्री. जोशी यांच्याकडे शुक्रवारी एका पत्राद्वारे केली आहे. येथील नगर परिषदेने २००९-१० मध्ये चतुर्थ वार्षिक कर आकारणीच्या वेळी लॉजिंग व हॉटेल व्यवसाय या इमारतींचा सर्वे करून मालमत्ता कराच्या आकारणीमध्ये वाढ केली आहे. मात्र ही कर प्रणाली हॉटेल किंवा लॉजिंग व्यावसायिकांनी सांगितलेल्या रूमच्या भाडे आकारणीच्या निम्मे दराने निश्चित करून वर्षातील ४५ दिवसांचा व्यवसाय गृहित धरून केलेली आहे. मात्र या आकारणीवेळी संबंधित व्यावसायिकांनी आक्षेत घेत चिपळुणातील न्यायालयात दाद मागितली होती. यावर नगर परिषदेने जिल्हा सत्र न्यायालयात अपिल केले होते. या न्यायालयाचा निर्णयही नगर परिषदेच्या विरोधात केला आहे. त्यामुळे आता या कराविषयीचा प्रश्न निर्माण झाला आहे.