
इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आणि पुसायचे आहेत. तुम्ही ते काम करा संजय राऊत यांची शिंदे गटावर टीका
मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेनेचा उद्या विजयी मेळावा, मुंबईत होत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात हा विजयी मेळावा होत आहे. त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी, डावे पक्ष आणि इतर संघटनांनी पाठिंबा दिला आहे.उद्याचा दिवस राजकारणात बदल घडवणार आहे. 5 जुलै हा ऐतिहासिक दिवस असेल असे खासदार संजय राऊत म्हणाले. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिंदे गटाला खणखणीत टोला लगावला. तर गिरीश महाजन गुंड टोळ्या चालवतात असा गंभीर आरोप केला.शिंदे गटातील अनेक नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्यावर टीका करत आहेत. विशेषतः रामदास कदम, नारायण राणे यांनी मोर्चा सांभाळला आहे. आज झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी शिंदे सेनेवर जोरदार टीका केली. दोन्ही ठाकरे एकत्र येणार असल्यामुळे जे शिवसेना सोडून गेले, जे आमचे जुने सहकारी होते, त्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठल्याचे राऊत म्हणाले. त्या भयातून अशी वक्तव्य करण्यात येत आहेत. त्यांचे वैफल्य दिसून येत आहे, असे राऊत म्हणाले.आता रामदास कदम काय बोलत आहेत, दुसरा काय बोलत आहे, हे सुरूच राहणार. कारण ठाकरे बंधुंच्या निमित्ताने मराठी माणूस जरी एकत्र आला तरीही जी 5-25 टाळकी आहेत, त्यांना हे बघवत नाही. त्यातही खास करून मिंधे गटातील लोकांना हे पचनी पडलेले नाही. मिंधे गटातील नेत्यांचे राजकीय भविष्यच खत्म होत आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत आहेत. चाराने की भांगमध्ये अशा कल्पना सुचत आहेत.
जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाही ते काय एकत्र येतील, अशी टीका ठाकरेंवर करण्यात येत आहे, त्याचा समाचार राऊतांनी घेतला. त्यांना आता काय करायचं या उचापती. ते कालपर्यंत बाळासाहेब ठाकरेंचे होते, उद्धव ठाकरे यांचे होते. तुम्ही आता मोदी, शाह आणि फडणवीस यांचे झालात ना. तुम्ही तेवढ्यापूरतं बघा. तुम्ही आमच्यात पडू नका. आता आमचं काय होणार, या भीतीतून ही विधानं करण्यात येत आहे. तुम्ही मोदींची, अमित शाह, फडणवीस, बावनकुळे, गिरीश महाजन यांची चिंता करा. तुमच्यासमोर फार मोठे कार्य आहे. इतक्या लोकांचे बूट तुम्हाला चाटायचे आणि पुसायचे आहेत. तुम्ही ते काम करा. तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका. ठाकरेंचे काय होणार, शिवसेना-मनसेचे काय होणार याची तुम्हाला चिंता करायची गरज नाही. तुम्ही स्वत:चीच चिंता करा, असा खरमरीत टोला राऊतांनी लगावला.