एस.टी. स्टँड परिसरात कचरा साठला ठेकेदारांनी सफाई कामागारांचे पैसे न दिल्याने काम बंद
रत्नागिरी ः एसटी महामंडळाने नेमलेल्या ठेकेदार कपनीने गेले दोन महिने कामगारांचे पगार न दिल्याने कामगारांनी काम बंद करण्याची भूमिका घेतली आहे. गेले चार दिवस कामगार न आल्याने एस.टी.च्या रत्नागिरी विभागीय कार्यालयासह रत्नागिरी, लांजा, दापोली डेपोत कचर्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विभाग नियंत्रकांनी ठेकेदार कंपनीला नोटीस बजावली आहे. मात्र प्रत्यक्ष कामगार आल्याशिवाय एस.टी. आगारातील स्वच्छता करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. रत्नागिरीतील सर्व एस.टी. स्थानक व आगारातील स्वच्छतेसाठी ब्रिक्स कंपनीला ठेका देण्यात आला आहे. रत्नागिरी विभागात ब्रिक्स कंपनीने क्रिस्टल कंपनीला काम दिले आहे. क्रिस्टल कंपनीकडून सर्व आगार व स्थानकावर स्वच्छता राखण्याचे काम योग्य प्रकारे सुरू होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या कंपनीच्या कामगारांनी काम बंद ठेवले आहे. ठेका घेणार्या कंपनीने या कामगारांचे मार्च व एप्रिल महिन्यांचे वेतन थकवले असल्याने कामगारांनी हा निर्णय घेतला आहे. रत्नागिरी विभागातील लांजा, रत्नागिरी व दापोलीतील स्वच्छता कामगारांनी काम बंद ठेवले आहे.