
आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी कोसुंबच्या प्रा. अवधूत पोटफोडे यांच्या कलाकृतींची निवड
देवरूख : मणिकर्णिका आर्ट गॅलरी, झांसी यांच्या कला प्रदर्शनासाठी कोसुंंब गावातील प्रा. अवधूत पोटफोडे यांच्या दोन चित्रांची निवड करण्यात आली आहे.
मणिकर्णिका हे कलादालन उत्तर प्रदेशमधील झाशी या ठिकाणी आहे. या कलादालनामध्ये विशेष करून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कलाकारांची प्रदर्शने भरवली जातात. ही गॅलरी कलाकारांच्या प्रोफाईल मागवून योग्य त्या कलाकाराचे निवड करून निवडक कलाकारांचे एकत्रित प्रदर्शन या कलादालनामध्ये भरविले जाते. त्याचबरोबर या कला दालनाच्या माध्यमातून कलाकारांच्या कलेला प्रसिद्धी दिली जाते. या आर्ट गॅलरीला अनेक पर्यटक, कलारसिक भेट देत असतात.
यावर्षी महाराष्ट्रातून प्रा. अवधूत पोटफोडे यांच्या दोन कलाकृतींची निवड झाली असून या दोन्ही कलाकृती स्टील लाईफ पेंटिंग म्हणून ओळखल्या जातात. या कला या दोन्ही कलाकृती तैल रंगातील आहेत.
हे प्रदर्शन दि.15 ते 25 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनामध्ये देश-विदेशातील 60 कलाकारांची चित्रे प्रदर्शित केली जाणार आहेत. प्रा. अवधूत पोटफोडे यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
