
आजीची भाजी रानभाजीदिंडा आणि पाथरी
आजी आणि तिची रानभाजी ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा औषधी गुणकारी बटवा आणि मानवी आरोग्य समृध्द करणारी तिची रानभाजी या नव्या पिढीपासून काळाच्या ओघात हरवत जात आहे. अशा रानभाज्यांची ओळख करुन देणारी आजीची भाजी रानभाजी ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा रत्नागिरी यांच्या सौजन्याने जिल्हा माहिती कार्यालयामार्फत सुरु केलेल्या या मालिकेत आजची रानभाजी आहे दिंडा आणि पाथरी..
दिंडा या वनस्पतीला ढोलसमुद्रीका असे स्थानिक नाव आहे. औषधामध्ये दिंडा चे मूळ वापरले जाते. वनस्पतीत ग्राही, वेदनास्थापन आणि रक्तस्कंदन हे इतर औषधी गुणधर्म आहेत. कंदाचा लेप नायट्यावरही प्रसिध्द आहे.
दिंड्याचे देठ शेवग्याच्या शेंगांप्रमाणे दिसेपर्यंत सोला. नंतर चिरुन धुवून घ्या. एका कढईत तेल गरम करुन मोहरी, जिरे व हिंग टाका. त्यात कांदा, लसूण घाला. गुलाबी झाल्यावर गरम मसाला व चिरलेली भाजी टाका. झाकण ठेवून मंद आचेवर भाजी शिजवून घ्यावी. ती शिजल्यावर त्यात गूळ कोकम कोंथिबीर, ओले खोबरे व चवीनुसार मीठ घालावे.
पाथरी
पाथरीला बोली भाषेत पात्री, पात्रंची भाजी असेही म्हणतात. ही कडू, शीतल, स्नेहन, ग्राही, वस्तन्यजनन गुणांची आहे. औषधात संपूर्ण वनस्पती वापरली जाते. पाथरीचा अंगरस ज्येष्ठमधाबरोबर दिल्यास बाळंणतिणीचे दूध वाढते. हे चाटण कोरड्या खोकल्यातही उपयोगी पडते. जनावरांना पाथरी चारा म्हणून वापरल्यास दूध वाढते.
पाथरीच्या पानांची भाजी ही औषधी गुणधर्माची आहे. या भाजीचा उपयोग जुन्या त्वचा रोगात होतो. कावीळ, यकृत विकारात ही भाजी हितावह आहे. या भाजीने पित्ताचा त्रास कमी होतो.
पाथरीची पाने स्वच्छ धुवून चिरुन घ्यावीत. तेलात कांदा परतून नंतर त्यात वाटलेला लसूण, तिखट, दाण्याचे कुट व भाजी घालावी. चांगले परतून घ्यावी. नंतर गरजेपुरते मीठ घालावे. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी घालून भाजी परतवून वाफेवर शिजवावी. दाण्याचे कुट ऐवजी डाळीचे पीठ लावूनही भाजी करता येते.
दुसऱ्या पध्दतीत पाथरीची चिरलेली भाजी शिजवून घोटून घ्यावी. त्यामध्ये मीठ, साखर, बेसन व ताक टाकून एकजीव करावे. शिजवलेली डाळ व दाणे घालावेत. फोडणीत 2 मिरच्या व इतर साहित्य घालून त्यात एकजीव केलेली भाजी ओतावी व ढवळत राहून उकळावी. ताकाऐवजी चिंचेचा कोळ व गुळ घालूनही भाजी करता येते. त्याचबरोबर नारळाचे दूध व चिंचेचा थोडा कोळ घालूनही भाजी छान होते. – प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी




