
*सिंधुदुर्गात मनसेत धुसफूस, माजी आमदार परशुराम उपरकर पक्षातून बाहेर; राज ठाकरेंचा मोठा निर्णय*
____सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे.मागील काळात राज ठाकरेंचा कोकण दौरा झाल्यानंतर याठिकाणची जिल्हा कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती. तेव्हापासून पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज होते. अखेर आज मनसे कार्यालयाने पत्रक काढून परशुराम उपरकर आणि प्रविण मर्गज यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही असं जाहीर केले आहे.मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्र काढून म्हटलंय की, राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम उपरकर, प्रविण मर्गज यांचा यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाही, संबंधितांनी याची नोंद घ्यावी असं कळवले आहे. निवडणुकीच्या काळात मनसे संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहे. परंतु अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील नेते, पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत. परशुराम उपरकर हे मनसेचे सरचिटणीस होते. मात्र राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावर उपरकर हे नाराज होते. गेल्या वर्षभरापासून परशुराम उपरकरांनी पक्षाच्या कुठल्याही कार्यक्रमात किंवा व्यासपीठावर गेले नाहीत. बैठकांना हजर राहिले नाहीत. माजी आमदार म्हणून ते मतदारसंघात कार्यरत राहिले.राज ठाकरेंच्या दौऱ्यानंतर कोकणासाठी मनसे संपर्क नेत्यांची घोषणा करण्यात आली. या संपर्क नेत्यांनी जिल्ह्यातील कार्यकारणीची निवड केली. परंतु त्यात ज्यांना बरखास्त केले होते अशांनाही संधी देण्यात आली. काहींनी मर्जीतले पदाधिकारी नेमले. त्यामुळे परशुराम उपरकर नाराज होते. यातूनच ते मनसे पक्षातून दूर होत गेले आणि आज त्यांचा पक्षाशी काही संबंध नाही असं जाहीर करण्यात आले. यापुढच्या काळात कार्यकर्त्यांची बोलून पुढील दिशा काय असेल ते ठरवू असं परशुराम उपरकर यांनी सांगितले आहे.www.konkantoday.com