मत्स्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री न्याय देणार!

0
278

रत्नागिरी : मत्स्य विद्यापीठातून पदवी घेतलेल्या मत्स्य महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पदव्या अवैध असल्याची सुनावणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने केल्यानंतर त्याच्या दुसऱयाच दिवशी म्हाडा अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांची तातडीने भेट घेतली. चर्चेदरम्यान आज हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य पदव्यांवर अवलंबून असताना या पदव्या ग्राहय़ धरा आणि म्हापसूला मस्त्य महाविद्यालय जोडू नये, अशी विनंती सामंत यांनी केली. यासंदर्भात सोमवारी आपण संबंधित विद्यार्थ्यांशी चर्चाही करणार असल्याची माहिती आमदार सामंत यांनी दिली.
नागपूर खंडपीठाने डॉ.बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या मत्स्यशास्त्र विषयातील 2000 सालापासून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना प्रदान केलेल्या विविध पदव्या अवैध असल्याचा एका याचिकेवर निर्णय दिला होता. तसेच मत्स्य महाविद्यालय म्हापसू नागपूरशी जोडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार सामंत यांनी शुक्रवारी रात्री 9.30 वा.च्या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांची तातडीने भेट घेतली. यावेळी मत्स्य विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार यांच्याशी सामंत यांनी चर्चा केली. यावेळी अनुपकुमार यांनीही विद्यार्थ्यांची मागणी योग्य असल्याचे सामंत यांना सांगितले.
याविषयी सामंत हे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि पशूसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांच्याशीही याविषयी चर्चा करणार आहे. कोकणासाठी स्वतंत्र मत्स्य विज्ञान विद्यापीठाची निर्मिती करण्याचा प्रस्ताव आमदार सामंतांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. कोकणातील या मत्स्य विद्यापीठाची संलग्नता नागपूर म्हापसू विद्यापीठाशी होणार नसून स्वतंत्र विद्यापीठाशी आपण प्रयत्न करणार आहोत. यासाठी मुख्यमंत्र्यांसह अनेक विभागांच्या मंत्र्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे आमदार सामंत यांनी बोलताना सांगितले.
शिरगाव-रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या शिष्टमंडळाने रविवारी सकाळी आमदार उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी शिरगाव-रत्नागिरी मत्स्य महाविद्यालय कोकण कृषी विद्यापीठाची संलग्न करणे आणि विद्यार्थ्यांच्या पदव्या ग्राह्य धरण्याची मागणी केली. यावेळी मत्स्य महाविद्यालयाचे हुकूमसिंग दाकड, चौधरी, मोहिते, शिरधनकर, पागरकर उपस्थित होते.
शासनस्तरावर लवकरात-लवकर निर्णय न झाल्यास विद्यार्थी, शिक्षकवर्ग आणि सर्व कोकणातील लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा आमदार सामंत यांनी दिला. शिष्टमंडळासमवेत सामंत मंत्रालयीन स्तरावर या प्रश्नांसंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करणार असल्यामुळे आलेल्या शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले.