आंबा लिलावगृहात शेतकरी फिरकलेच नाहीत
रत्नागिरी – जिल्हय़ातील आंबा उत्पादकांना आंब्याची विक्री जिल्ह्यातच करता यावी यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत उभारण्यात आलेल्या लिलावगृहाकडे आंबा उत्पादक फिरकलेच नाहीत. येथील शेतकऱ्यांना आंब्याची विक्री येथेच करता यावी यासाठी सुमारे सव्वा कोटी रुपये खर्च करून बाजार कृषी समितीमार्फत लिलाव गृह बांधण्यात आले. येथील उत्पादकांचा आंबा खरेदी करता यावा यासाठी कोल्हापूर ,सोलापूर ,सांगली, मुंबई येथील दलालांशी चर्चा करण्यात आली होती. कोकणातील आंबा उत्पादकांना स्वतःचा माल स्वतः दर ठरवून विकता येणार होता . यासाठी स्थानिक उत्पादकांची बैठक घेऊन या उपक्रमाची माहिती देण्यात आली होती.मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी आंबा उत्पादक फिरकलेच नाहीत. कोकणातील उत्पादकांचा आंबा मुख्यता वाशी येथे मोठ्या प्रमाणावर जात असतो.जर या ठिकाणी बाहेरचे व्यापारी आले असते तर स्थानिक उत्पादकांना चांगला दर मिळू शकला असता .बाजार समितीचा उपक्रम चांगला असूनही त्याला प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचा हा प्रयत्न या वर्षी तरी वाया गेला आहे.