सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२९ ग्राम पंचायतींनी 93% मागासवर्गीय समाज विकासनिधी खर्च केला.
सिंधुदुर्गनगरी, ता.७ : जिल्ह्यातील ४२९ ग्राम पंचायतींनी २०१८-१९ या आर्थिक वर्षात मागासवर्गीय समाज विकासासाठी असलेला १५ टक्के राखीव निधी ९३ टक्के एवढा लक्षवेधी खर्च केला आहे. ३ कोटी ८३ लाख ५९ हजार एवढ्या निधीतील ३ कोटी ५७ लाख २७ हजार एवढा निधी खर्च केला आहे. यामध्ये कुडाळ, कणकवली, मालवण व दोडामार्ग या तालुक्यांनी १०० नंबरी काम केले आहे.
महाराष्ट्र शासनाने ग्राम पंचायतींच्या अधिकारात वाढ केली असून विकासासाठी निधीतही वाढ केली आहे. ग्राम पंचायत हि स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ग्रामीण भागात काम पाहत असल्याने ग्राम पंचायतचे आर्थिक वर्षांचे स्वतंत्र बजेट असते. त्यानुसार निधी खर्च केला जातो. यामध्ये एकूण बजेटच्या ५ टक्के निधी हा गावातील अपंग व्यक्तींच्या विकासासाठी खर्च करावयाचा असतो. तर १५ टक्के निधी हा गावातील मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी खर्च करणे बंधनकारक असते. त्याप्रमाणे मागासवर्गीय समाजासाठी १५ टक्के निधी प्रत्येक ग्राम पंचायत राखीव ठेवत असते. जिल्ह्यात ४२९ ग्राम पंचायती असून या सर्व ग्रां. प. चा मिळून ३ कोटी ८३ लाख १९ हजार एवढा निधी पूर्ण जिल्ह्यात राखीव होता. २०१७-१८ या मागील वर्षातील केवळ ४० हजार रुपये निधी खर्चाचा शिल्लक होता. परिणामी २०१८-१९ मध्ये ३ कोटी ८३ लाख ५९ हजार रुपये एवढा निधी एकूण खर्च करावयाचा होता. त्यातील २६ लाख ३२ हजार एवढा निधी खर्च झालेला नाही. यामध्ये २०१७-१८ मधील थकीत ४० हजार रुपये रक्कमही खर्च करण्यात आलेली नाही.
यामध्ये तालुकावार आढावा घेतल्यास सावंतवाडी तालुक्याने सर्वाधिक ७६ टक्के एवढा खर्च केला आहे. ७४ लाख ७० हजार पैकी ५६ लाख ४७ हजार रुपये खर्च झाले असून १८ लाख २३ हजार रुपये अखर्चित राहिले आहेत. वेंगुर्ला तालुक्याने ८२ टक्केच खर्च केला असून ३४ लाख ३८ हजार पैकी २८ लाख ३५ हजार रुपये खर्च केले आहेत. ६ लाख ३ हजार रुपये शिल्लक राहिलेले आहेत. वैभववाडी तालुक्याने २६ लाख ४० हजार पैकी २२ लाख ६१ हजार रुपये खर्च केले आहेत. ३ लाख ७९ हजार अखर्चित असून ८६ टक्के काम झाले आहे. देवगड तालुक्याने ९९ टक्के काम केले आहे. ३९ लाख ८ हजार पैकी ३८ लाख ५१ हजार रुपये खर्च केले आहेत. ५७ हजार रुपये शिल्लक राहिलेले आहेत. त्यात २०१७-१८ मधील ४० हजार रुपये आहेत. कुडाळ तालुक्याने १०४ टक्के काम केले आहे. कणकवली, मालवण, दोडामार्ग या तालुक्यांनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य केले आहे.
*५ टक्के अपंग निधी ९४ टक्के खर्च :*
४२९ ग्राम पंचायतींना १ कोटी २६ लाख ८ हजार रुपये एवढा ५ टक्के अपंग कल्याण राखीव निधी खर्च करावयाचा होता. यातील १ कोटी १८ लाख रुपये एवढा ९४ टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. तर ८ लाख ३४ हजार रुपये एवढा निधी खर्च झालेला नाही. यातही सर्वाधिक कमी सावंतवाडी तालुक्याने ७२ टक्के एवढा निधी खर्च केला आहे. दोडामार्ग, देवगड, मालवण, कणकवली व कुडाळ या पाच तालुक्यांनी हा खर्च १०० टक्के केला आहे.