
परराज्यातील आंबा विक्रेत्यांची रत्नागिरीत घुसखोरी
रत्नागिरी : रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये परराज्यातील फळ विक्रेत्यांनी मोठय़ा प्रमाणात घुसखोरी केली असून गोखलेनाका परिसरात ‘दुकाने’ मांडली आहेत. ‘हापूस’ च्या नावाखाली या व्यापाऱयांकडून कर्नाटकी आंबा ग्राहकांच्या माथी मारला जात आहे. दरम्यान, स्थानिक विक्रेत्यांसोबत अरेरावीचे प्रकार वाढू लागले आहेत. त्यामुळे संतप्त स्थानिक विक्रेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून नगर परिषदने त्यांच्याविरोधात कारवाईचे संकेत दिले आहेत.
हापूस आंबा ही रत्नागिरीची खास ओळख मानली जाते. सध्या बाजारपेठेत, नाक्या-नाक्यांवर हापूसची मोठय़ा प्रमाणात विक्री केली जाते. मात्र आता या क्षेत्रात परराज्यातील विक्रेत्यांनी घुसखोरी केली असून बाजारपेठ, रत्नागिरी रेल्वेस्थानक आदी परिसरात त्यांनी बस्तान मांडले आहे. ‘हापूस’ च्या नावाखाली या विक्रेत्यांकडून कर्नाटकी आंबा गिऱहाईकांच्या माथी मारला जात आहे. परराज्यातील या विक्रेत्यांमुळे हापूस बदनाम होऊ लागला आहे.
परराज्यातील या विक्रेत्यांचा विषय फसवणुकीपुरताच मर्यादीत नसून त्यांनी अरेरावीही मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते. गोखलेनाका ते विठ्ठलमंदिर हा दाटीवाटीचा रस्ता ही आंबा बाजारपेठ बनली आहे. परराज्यातील विक्रत्यांनी येथील मोक्याच्या जागा पटकावल्याने स्थानिक व्यापाऱयांची अडचण होत आहे. यातून अनेकदा वादावादीचे प्रकार घडत आहे. परराज्यातील विक्रेत्यांचा वाढता पसारा वाहनांसाठीही अडसर ठरत आहे. त्यामुळे वाहनधारकांसोबतच्या शाब्दीक बाचाबाजीचे प्रकार वाढले आहेत.
शनिवारी देखील रिक्षा वळवण्यासाठी स्टॉल मागे घेण्यास सांगितल्याने परप्रांतीय विक्रेत्याने रिक्षा चालकाशी जोरदार हुज्जत घातली. त्यामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला होता. यावेळी काही स्थानिक व्यापाऱयांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता त्या व्यापाऱयाने त्यांच्याशीही अरेरावीची भाषा केली. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या प्रकाराने स्थानिक विक्रेत्यांनी संतप्त पवित्रा घेत याबाबतचा तक्रार केली. त्याची दखल घेत परराज्यातील व्यापाऱयांना शिस्त लावण्यासाठी कडक पावले उचण्याचे संकेत नगर परिषदेकडून देण्यात आले.
‘जीआय’ प्रमाणपत्र आवश्यक
रत्नागिरीची खास ओळख असलेल्या ‘हापूस’ वर ‘जीआय’ मानांकनाची मोहर उठली आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गतील विशीष्ट भौगोलिक क्षेत्रात तयार होणाऱया आंब्यालाच ‘हापूस’ हे नाव वापरता येणार आहे. मात्र त्यासाठी हापूस उत्पादकांनी जीआय नोंदणी प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. असे झाल्यास ‘हापूस’च्या नावाखाली होणारी ग्राहकांची फसवणूक रोखणे व त्यावर कायदेशीर कारवाई करणे शक्य होणार आहे. याबाबत मोठया प्रमाणावर जनजागृती होण्याची गरज आहे.