सावंतवाडी-होळीचा खुंट परिसरात गव्यांचा संचार
सावंतवाडी, ता. ५ :येथील नरेंद्र डोंगर परिसरातून होळीचा खुंट येथे तब्बल सहा गव्यांच्या कळपाने परिसरात संचार करत असल्याचे दिसून आले. हा प्रकार रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. महाकाय गवे थेट दारात आल्याने अनेकांनी त्यांना पाहण्याचा आनंद घेतला. काहींनी भिती व्यक्त केली.
याबाबतची माहिती सावंतवाडीतील व्यावसायिक मुन्ना नेमळेकर यांनी दिली. ते आपला मित्र लतेश नलावडे याला सोडण्यासाठी होळीचा खुंट परिसरात गेले होते. यावेळी हे गवे नरेंद्र डोंगराच्या रस्त्यावरून थेट उतरून येथील जॉनी डिसोजा यांच्या घरासमोर कृषी विभाग कार्यालयाकडे उतरले. महाकाय गवे पाहून अनेकांनी भिती व्यक्त केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वनविभागाने दक्षता घ्यावी अशी मागणी तेथील नगरसेवक सुधीर आडिवरेकर यांनी केली आहे.