
१०९ आंबा पेट्यांची परस्पर विक्री; देवगडमधील शेतकऱ्याची फसवणूक
देवगड दि.०४- उत्तम प्रतीच्या आंब्याच्या शंभरहून अधिक पेट्या हव्या असल्याचे सांगून देवगडमधील शेतकऱ्याच्या १०९ आंब्याच्या पेट्यांची परस्पर विक्री करून एक जण पसार झाला. तक्रारदार शेतकरी गावातील अनेक शेतकऱ्यांकडून आंबे जमवून ते विक्रीसाठी मुंबईत घेऊन आला होता. सीसी टीव्हीमध्ये आरोपीचे छायाचित्र कैद झाले असून, त्याच्या साह्याने बोरिवलीतील कस्तुरबा मार्ग पोलिस संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.
तक्रारदार कृष्णनाथ राणे यांच्या एका नातेवाइकाला आरोपीने फोन करून शंभर किंवा त्यापेक्षा जास्त पेट्या उच्च प्रतीचा आंबा हवा असल्याचे सांगितले. अनिल नावाच्या व्यक्तीचा दूरध्वनी क्रमांक त्यांना दिला. अनिलने राणे यांच्याकडून शंभरहून अधिक पेट्या मागवल्या. राणे यांनी गावातील इतर शेतकऱ्यांकडून माहिती घेऊन अनिलला दूरध्वनी करून १०९ पेट्या मिळत असल्याचे सांगितले. त्यानंतर अनिलने एक हजार ८०० रुपये प्रतिपेटी भाव देणार असल्याचे सांगून सर्व पेट्या बोरिवली मार्केटमध्ये घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार राणे यांनी सोमवारी टेम्पोने मार्केटमध्ये पेट्या आणल्या. संशयित आरोपी अनिलने त्यांना व्यापाऱ्याकडे आंबे विकल्यानंतर तुमचे पैसे देऊ, असे सांगितले. राणे यांनी बोरिवली मार्केटमध्ये जाऊन व्यापाऱ्याकडे चौकशी केली असता अनिलने सकाळीच आंब्याचे पैसे घेतल्याचे त्यांना समजले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर राणे यांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.