
थिबा राजवाडयाचे अंतरंग आता पर्यटकांसाठी खुले!
रत्नागिरी ः जागतिक पर्यटनाच्या नकाशावरील ऐतिहासिक थिबा राजवाडा दुरूस्तीच्या कारणास्तव सुमारे १० वर्षांपासून पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला होता. मात्र आता या राजवाडयाच्या दुरूस्तीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे शुप्रवारपासून पुरातत्व विभागाने हा राजवाडा पर्यटकांसाठी खुला केला असून पर्यटकांना राजवडयाचे अंतरंग पाहता येणार आहेत. पुरातत्व विभागाचे प्रभारी साहाय्यक संचालक विलास वाहाणे यांनी गुरूवारी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
कोटयवधीचा निधी खर्चून थिबा राजवाडयाची दुरूस्तीचे काम सुरू आहे. २००५ पासून वेगवेगळया कामांवर निधी खर्च होत आहे. त्यासाठी पूर्वी ६५ लाख खर्च करण्यात आले होते. त्यानंतर अलिकडे राज्य संरक्षित स्मारक जतन-दुरूस्ती योजनेतून राजवाडयाच्या छताच्या कामासाठी १ कोटीचा निधी मंजूर होऊन छताची दुरूस्ती करण्यात आली. राजवाडयातील लाकडी सामान त्यामध्ये खिडक्या, दरवाजे, बडोद बदलणे, लाद्या आदी कामांसाठी १ कोटी ३५ लाखाचा निधी मागील काळात मंजूर झाला होता. त्यातून मोडकळीस आलेले लाकडी सामान बदलणे व दुरूस्ती आदी कामे करण्यात आली आहेत. अजूनही काही कामे अंशतः शिल्लक आहेत.
सुरूवातीच्या काळात दुरूस्तीला झालेला विलंब व निकृष्ट दर्जाबाबत तत्कालीन जिल्हाधिकार्यांनी कानउघडणी करत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर ठेकेदार व इंजिनियर यांच्याकडून राजवाडयाच्या अंतर्गत फर्निचर आदी कामे अंतिम टप्प्यात नेण्यासाठी जोरदार कार्यवाही करण्यात आली. छप्पर, गॅलरी, खिडक्या, जिने व अन्य कामे पूर्ण करण्यात आली. राजवाडा बांधण्यात आला, त्यावेळी ज्या पद्धतीने काम झाले त्या पद्धतीनेच पुरातत्व विभागाच्या सूचनांनुसार सागवानी लाकडामध्ये संपूर्ण लाकडी काम करण्यात आले आहे.
तिसर्या टप्प्यात निधी मंजूर झाल्यावर आणखी कामांना सुरुवात होणार आहे. यात राजवाडयाचे सुशोभिकरण, संग्रहालय व अन्य कामांचा समावेश आहे.