
जादा दराच्या अमिषाने काजू उत्पादकांना गंडा?
देवरुख ः काजू बीसाठी बाजारातील चालू दरापेक्षा जादा दर देण्याचे आमिष दाखवून बागायतदारांना लाखोंचा गंडा घातल्याचा प्रकार तालुक्यातील निवेबुद्रूक पंचक्रोशीत घडला आहे. फसवणुकीचा हा आकडा २० ते २५ लाखा दरम्यान ही फसवणुक असल्याची चर्चा सुरु आहे. याबाबत काही बागायतदार शुक्रवारी पोलिस स्थानकात धाव घेतली, मात्र उशीरापर्यंत तक्रार दाखल झाली नव्हती.
यावर्षी काजू बीला म्हणावा तसा दर मिळाला नाही. गतवर्षी १६० रूपये प्रतिकिलो दराने विक्री झालेल्या काजू बीला यंदा ११० ते १२० च्याच दरम्यानच दर मिळाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. नेमका याचाच गैरफायदा एका परजिल्हयातील व्यापार्याने घेतला. दरम्यान हा व्यापारी मूळ निवेबुद्रूक पंचक्रोशीतीलच असल्याचे समजते.
या व्यापार्याने फेब्रुवारी महिन्यापासून काजू-बी खरेदीसाठी निवेबुद्रूक व तुळसणी येथे दुकान थाटले. बाजारात ११० च्या दरम्यान दर असताना या व्यापार्याने १६० ते १७० रूपये प्रतिकिलो दराने काजू बी घेण्यास सुरुवात केली. इतर ठिकाणापेक्षा ४० ते ५० रुपये अधिक दर मिळत असल्याने छोटे-मोठया शेतकर्यांनी काजू बी देण्यास सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्याने रोखीने पैसे दिल्याने शेतकर्यांचा विश्वास बसला. त्यानंतर मात्र त्याने शेवटच्या टप्प्यात त्यांनी उधारीवर हा धंदा सुरु केला.
हा व्यापारी पंचक्रोशीतीलच असल्याने सर्वच काजू शेतकर्यांनी त्याच्यावर विश्वास टाकला. मात्र गेले महिनाभर या व्यापार्याने येथून पोबारा केला आहे. त्याचा मोबाईलही बंद आहे. दुसर्या जिल्हयात तो वास्तव्यास आहे, मात्र त्याचा पत्ता माहित नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकर्यांचे सुमारे २० ते २५ लाख रूपये तो देणे असल्याचे समजते.
या व्यापार्याशी कोणताच संपर्क होत नसल्याने निवेबुद्रूक पंचक्रोशीतील हवालदिल झालेल्या काही शेतकर्यांनी शुक्रवारी पोलिस स्थानकाची पायरी गाठली. रात्री उशीरापर्यंत मात्र याबाबत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. हा व्यापारी जादा दर देत असल्याने काहीजणांनी शेतकर्यांकडून १२० ते १३० रुपयांच्या दरम्यान काजू बी खरेदी केली व या व्यापार्याकडे त्याची विक्री केली. यामुळे हे मधले व्यापारीही अडचणीत सापडले आहेत.